पोलिसांनी आम्हाला अटक केलीय, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडणार : किरीट सोमय्या

 रत्नागिरी  – भाजपा नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दोपोलीतील रिसॉर्टवरुन दापोलीत सोमय्या आणि पोलीस आमने-सामने आले असल्याचं चित्र पाहायला मिळत होते.

दरम्यान, जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सोमय्यांना नोटीस बजावली होती. मात्र किरीट सोमय्या मुरूडला रिसॉर्टवर जाणार या भूमिकेवर ठाम होते . त्यानंतर किरीट सोमय्या हे निलेश राणे यांच्यासोबत रिसॉर्टकडे निघालेले असताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर आता किरीट सोमय्या हे दापोली पोलीस स्टेशनच्या दारातच आंदोलनासाठी ठाण मांडून बसले होते.

दरम्यान, नुकतीच जी माहिती समोर येत आहे त्यानुसार किरीट सोमय्या आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यासह भाजपनेत्यांना अटक करण्यात आली असून आता या सर्वांना रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

सोमय्या म्हणाले, आम्ही जो सत्याच्या आग्रहासाठी आलो होतो. त्यासाठीचा आग्रह अजून सुरु आहे. सर्व्हे नंबर 446 जे रिसॉर्ट बांधले आहेत ते अनिल परब यांचे आहेत. अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. 30 तारखेला दापोली कोर्टात सुनावणी सुरु आहे भारत सरकारच्या याचिकेवर सुरु आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट तुटेपर्यंत तो रिसॉर्ट बांधण्यासाठी जो पैसा खर्च करण्यात आला त्यासंदर्भात ईडी, आयटी, ग्रीन ट्रिब्युनलकडे तक्रार केलीय. पोलिसांनी आम्हाला अटक केली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडे सोडणार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.