संघाला हिंदुत्ववाद नाही, ब्राह्मणवाद आणायचा आहे; नव्या संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून चौधरींची टीका

नवी दिल्ली – दिल्लीतल्या संसदेच्या नव्या वास्तूचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. साधूसंतांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम सोहळा पार पडला. नव्या संसदेचं लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सेंगोल (राजदंड)ची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर सर्व धर्मीयांची प्रार्थना पार पडली.

उत्तम वास्तुकलेचा नमुना असणारी ही इमारत देशाच्या समृद्धीचं आणि प्रगतीचं प्रतीक ठरणार आहे. या वास्तुतल्या कार्यालयीन व्यवस्थेत अधुनिक आणि नवीनतम तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आलेला आहे.या वास्तुचा संपूर्ण परिसर 65 हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारला आहे. त्यामध्ये प्रादेशिक कला, सांस्कृतिक वारसा आणि हस्तकला यांचा वापर केला आहे. पुर्वीच्या संसद भवनाच्या तुलनेत तीनपट विस्तार असलेल्या लोकसभेच्या नव्या सभागृहाची आसनक्षमताही वाढली आहे. तिथे 888 आसनक्षमता आहे. राज्यसभेच्या सभागृहाची क्षमता 384 आहे.

दरम्यान, आजच्या या सोहळ्याकडे अवघे लक्ष ठेवून असताना विरोधकांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यातच आता सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी (Social activist Vishwambhar Chaudhary)  यांनी या सोहळ्यावर अपेक्षेप्रमाणे टीकाच केली आहे. हा असा भारत पहाणं सावरकरांचं स्वप्न होतं. ते मोदी आज मुद्दाम करतांना दिसत आहेत. प्रश्न या देशातल्या बहुजनांच्या स्वप्नातला भारत कोणता हा आहे.

आपल्याला मनुस्मृती आणि तिच्या अनुषंगानं येणारी गुलामगिरी पाहिजे का हा प्रश्न आहे. संघाला हिंदुत्ववाद नाही, ब्राह्मणवाद आणायचा आहे. हिंदुत्ववाद हे फक्त मतं मिळवण्यासाठीचं टूल आहे. खूप उशीर झालाय पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची शेवटची संधी 2024 च्या निवडणुकीत आहे. जर या प्रश्नाचं उत्तर चोवीस साली मतपेटीतून दिलं नाहीत तर राज्यघटना, लोकशाही, निवडणुका, सगळं विसरून जा. असं चौधरी यांनी म्हटले आहे.