पोलिसांनी आता वर्दी उतरवून शिवसेना-बजरंग दलात प्रवेश घेतला पाहिजे – जलील 

Imtiyaz Jaleel   : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 14 दिवसांपासून सुरु असलेलं साखळी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. मात्र उपोषण मागे घेतल्यानंतर जलील यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
पोलिसांकडून आम्हाला शिवीगाळ केली जात आहे. त्यामुळे अशा पोलिसांनी वर्दी उतरवून शिवसेना किंवा बजरंग दलात प्रवेश करावा,असे जलील म्हणाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात आलेल्या जलील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. मात्र आता पोलीसच शिवीगाळ करायला लागले असल्याने, आम्ही कुणाकडे न्याय मागितला पाहिजे.

पोलीस चुकीच्या पद्धतीने वागत असून, वाईट पद्धतीने बोलत असल्याने आम्ही याबाबत कोणाकडे दाद मागावी. त्यामुळे माझं म्हणणे आहे की, अशा पोलिसांनी आता वर्दी उतरवून शिवसेना-बजरंग दलात प्रवेश घेतला पाहिजे. तुम्ही जोपर्यंत पोलिसाच्या खुर्चीवर बसला आहात, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही एका धर्माचा, जातीचा, विचाराचे समर्थन न करता सर्वाना समान न्याय दिला पाहिजे असे जलील म्हणाले.