..आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, मुनगंटीवार यांच्या निर्णयाला प्राजक्ता माळीचा पाठिंबा

मुंबई – खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम (Vande Mataram) असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला आता पाठींबा मिळू लागला आहे. अनेक दिग्गज या निर्णयाचे स्वागत करत असताना मुनगंटीवार यांच्या या घोषणेला अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) सुद्धा पाठिंबा दिला आहे. प्राजक्ताची स्वातंत्र्यदिनाची पोस्ट यानिमित्त चर्चेत आली आहे.

काय आहे प्राजक्ताची पोस्ट?

‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव.. स्वातंत्र्यदिन चिरायू होवो. माझ्या प्रिय भारताचं स्वातंत्र्य, ऐक्य, सहिष्णूता, संस्कृती, सर्व धर्म समभाव विचार, महानता, परंपरा जगाच्या अंतापर्यंत अबाधित राहो. या कामी माझं आयूष्य खर्ची पडावं! या कामी सर्व देशवासीयांनी झटावं! आणि हो, आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम् सुरू. “देव देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती” ही भावना कधीही मरू नये हीच प्रार्थना,’ अशी पोस्ट तिने लिहिली असून त्यासोबत अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची एक कवितासुद्धा तिने पोस्ट केली आहे.