टिपू सुलतान प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी भाजपावर केला ‘हा’ गंभीर आरोप

पिंपरी-चिंचवड : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून संघर्षाला सुरुवात झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे केले आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

हा हिंदू मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा असल्याचं सांगत डॉ. आंबेडकर म्हणाले, “टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा आहे अस मी मानत नाही. आर.एस.एस आणि भाजपाला अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे जिंकण्याचं साधन आहे असं ते मानतात. हळू हळू आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायची सुरूवात केली आहे. मुंबईतही त्यांनी टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असं त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं”.