अवघ्या 1 मताने निवडणूक जिंकली; प्रसाद पाठक यांच्या विजयाची होतेय तालुकाभर चर्चा 

करमाळा –  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट (CM Eknath Shinde), भाजपा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यात प्रतिष्ठेची लढाई आहे. दरम्यान, या लढाईत भाजप (BJP) आणि शिंदे गटाची सरशी होताना पाहायला मिळत आहे.

अनेक उमेदवारी भव्यदिव्य विजय मिळवले असले तरीही करमाळा तालुक्यातील वडशिवणे या गावी झालेल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने निवडणुकीत बाजी मारणाऱ्या प्रसाद पाठक यांचा विजय तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. या गावात बागल गट विरुद्ध जगताप गट अशी थेट लढत होती.  नऊ जागांसाठी येथे निवडणूक झाली.

निकालाच्या दिवशी तहसीलदार समीर माने यांच्या नियंत्रणाखाली ही मतमोजणी झाली. यात बागल गटाला सात तर जगताप गटाला दोन जागा मिळाल्या आहेत. बागल गटाकडून राजश्री जगदाळे, शारदा साळुंखे, उषा जगदाळे, कमल वाघमारे, अमोल उघडे, विशाल जगदाळे, रुपाली देवकर हे विजयी झाले आहेत. तर जगताप गटाचे रत्नाकर कदम व प्रसाद पाठक हे दोघेही एकजण ३ तर दूसरा उमेदवार १ मताने विजयी झाले आहेत. यात पाठक यांनी ज्या उमेदवाराचा पराभव केला तो उमेदवार अतिशय दिग्गज असा उमेदवार होता बहुतांश वेळा त्यांच्या घरात सरपंचपद राहिलेले होते.

दरम्यान, या निवडणुकीत निसटता पराभव होत असल्याचे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. प्रसाद पाठक यांच्या पराभवासाठी शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा केवळ एका मताने पराभव दिसू लागल्याने  येथे पराभूत झालेले बागल गटाचे उमेदवार यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर तहसीलदार माने यांनी मागणीचा  विचार करून फेर मतमोजणी करण्यास सांगितले. मात्र त्यातही त्यांचा पराभव झाला. यावेळी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे स्वतः मत मोजणीच्या ठिकाणी आले होते. या विजयानंतर पाठक यांनी मतदारांचे आभार मानले आहेत तसेच विरोधी गटातील विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन सुद्धा केले आहे. जनतेची सेवा करण्यासाठी आणि प्रभागातील समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.