माफी मागा अन्यथा राज्यातील भाजप नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु – नाना पटोले

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान कदापी सहन करणार नाही...

मुंबई : महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार व केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर भाजपाला महाराष्ट्रद्रोही म्हणून काँग्रेस तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोरच्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, मा. खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, आमदार वजाहत मिर्झा, आमदार हिरामण खोसकर, आ. संग्राम थोपटे, आ. राजू पारवे, मा. आमदार मधु चव्हाण, सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, संघटन सरचिटणीस देवानंद पवार, सरचिटणीस राजेश शर्मा, मुनाफ हकीम, राजन भोसले, ब्रिज दत्त, सत्संग मुंडे, सरचिटणीस व प्रवक्त्या भावना जैन, प्रवक्ते भरतसिंह, सुरेश राजहंस, उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश सचिव राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, कोरोनाकाळात केंद्र सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले होते. या संकटाच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने लोकांना मदत केली. अचानक लॉकडाऊन लादल्याने घरातच अडकून पडलेल्या परराज्यातील लोकांना राशन, जेवण, औषधे व जिवनावश्यक वस्तू पुरवल्या. त्यानंतर आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईसह राज्यातील लाखो लोकांना काँग्रेस पक्षाने त्यांच्या राज्यात जाण्याची सोय करून दिली.

केंद्र सरकार त्यांच्या मदतीला धावले नाही पण काँग्रेस पक्ष त्यांच्या मदतीला धावला परंतु संसदेत पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरोप करताना उत्तर भारतीय लोकांना कोरोनास्प्रेडर ठरवून त्यांचाही अपमान केला व मदत करणाऱ्या महाराष्ट्राचाही अपमान केला. छत्रपती शिवरायांच्या नावाचा फक्त मतासाठी वापर करणाऱ्या भाजपाने शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. पंतप्रधान महाराष्ट्राचा अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खादसार संसदेत टाळ्या वाजवत होते हा अपमान महाराष्ट्र व उत्तर भारतीय जनता कदापी सहन करणार नाही. उत्तर प्रदेश आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला धडा शिकवून या अपमानाचा ते बदला घेतील.

यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा केलेला अपमान आम्ही सहन करणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविरोधात आंदोलन करत राहू. राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार यांच्या घरासमोर आंदोलन करू.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे व नसीम खान यांनी यावेळी बोलताना, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपा व पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कामगार, मजुरांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी त्यांची थट्टा केली. ज्या उत्तर प्रदेशने नरेंद्र मोदींसह भाजपाच्या ७९ खासदारांना निवडून दिले त्याच उत्तर प्रदेशाच्या जनतेचा हा अपमान आहे. मुंबईसह राज्यात परराज्यातील लाखो लोक कामासाठी येतात त्यांना महाराष्ट्राने नेहमीच साथ दिली आहे. संकट काळात मदतीला धावून जाणे ही काँग्रेसची परंपरा आहे, त्याच भावनेतून काँग्रेसने मदत केली.

महाराष्ट्रातून ८०३ रेल्वेच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना त्यांच्या राज्यात पाठवले. कोरोनाचा शिरकाव झाल्याबरोबर देशाच्या सीमा सील करण्याच्या सुचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या असतानाही नमस्ते ट्रम्पसाठी मोदींनी त्याला विलंब केला. मुंबईत येणारी विमानसेवा बंद करण्याची मागणी केली असता त्यालाही विलंब केला. मोदींच्या नाकर्तेपणामुळेच देशात कोरोना वाढला पण त्याचे खापर मात्र ते आज दुसऱ्यावर फोडत आहेत. पंतप्रधानांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशारा यावेळी देण्यात आला. मुंबई, नागपूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यात आंदोलन करुन भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यात आला.