‘नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा; एकही शेतकऱ्याचा पंचनामा बाकी राहता कामा नये’

नाशिक  :- नांदूरमध्यमेश्वर, देवगाव, कानळद, रुई, वाकद, कोळगाव,खेडलेझुंगे सह इतर अनेक गावांमध्ये गोदावरी डावा कालवा, गोदावरी उजवा कालवा या कालव्यांचा शेजारीस शेतामध्ये प्रंचड पाणी तुंबून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतातून पाणी जाण्यासाठी महसूल विभाग आणि जलसंपदा विभागाच्या यंत्रणांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात येऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत निफाड शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी पंचनामे आणि मदतीच्या निकषांबाबत त्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांच्यासोबत दूरध्वनी वरून चर्चा करून या भागातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आमदार दिलीपराव बनकर, प्रांतअधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणेश चौधरी यांच्यासह, राजेंद्र डोखळे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, हरिश्चंद्र भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, सुरेश खोडे, विलास बोरस्ते, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, पांडुरंग राऊत आदीसह अधिकारी पदाधिकारी व अनेक गावचे सरपंच उपस्थित होते.

निफाड तालुक्यात अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे कांद्याची रोपे सडली विशेषतः मक्याच्या पिकासह इतर सर्व पिके भुईसपाट झाली आहेत. सोयाबिन आणि उसाचेही नुकसान झाले. टोमॅटोसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून उभे केलेले मंडप कोसळून नुकसान झाले. पाणी आणि चिखलामुळे पिके सडली आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे या वर्षी दुसरे एक संकट निर्माण झाले. गोदावरी कालव्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत राज्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता व जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्याशी चर्चा करून शासनाच्या नियमावलीत बदल करण्याच्या सूचना यांनी केल्या. त्याप्रमाणे ६५ मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस असलेल्या मात्र संततधार पाऊस असल्याने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे प्रस्ताव सादर करण्यात यावेत अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच या कामात दिरंगाई आणि टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही अशा इशारा अधिकाऱ्यांना त्यांनी दिला.

ते म्हणाले की, कालव्यामुळे शेतात पाणी गेलेल्या ठिकाणचे सुद्धा पंचनामे करून शासनाला प्रस्ताव तातडीने शासनास पाठवावे.एकही शेतकऱ्यांवर अन्याय्य झाला तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल.खेडलेझुंगे, धरणगाववीर, डोंगरगाव, नांदगाव, गाजरवाडी, धरणगाव खडक, सारोळे आणि अजूनही या व्यतिरिक्त ज्या-ज्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

ते म्हणाले की, गोदावरी उजवा कालवा नूतनीकरणाचा प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती SLTAC) कडे गेलेला आहे. त्याचा पाठपुरावा करा. गोदावरी डावा कालवा नूतनीकरणाचा प्रस्ताव तात्काळ तयार करून फेअर सिझन मध्ये काम सुरु होईल असे नियोजन करण्यात यावे. देवगाव परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदण्याकरिता महसूल, जलसंपदा आणि पोलिसांनी एकत्रित काम करावे.कालवा दुरुस्तीच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.