पुणेकरांनो पाणी जपून वापरा; जलसंपदा विभागाचे नागरिकांना आवाहन

Pune – पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, खडकवासला सह चारही धरणांत मिळून उपलब्ध असलेला पाणी साठा लक्षात घेता; जलसंपदा विभागानं पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.

आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार,  शुक्रवारपर्यंतच्या मिळालेल्या आकडेवारीनुसार खडकवासला धरणात यंदा सुमारे ५६ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी यावेळी धरणात सुमारे ४० टक्के पाणी साठा होता. वरसगाव धरणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १२ टक्के अधिकचा पाणी साठा असल्याचं निदर्शनास आलं आहे.

सध्या वरसगाव धरणात अंदाजे ५६ टक्के पाणी शिल्लक आहे. मात्र पानशेत आणि टेमघर धरणामध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर घटला आहे. पानशेत धरणात केवळ २८ टक्के तर टेमघर धरणात अवघे ७ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

यंदा एप्रिलमध्ये पुण्यात सुमारे ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून एरवी या महिन्यात फारतर ५ ते ६ मिलीमीटर पाऊस पडतो. दरम्यान पुणे आणि परिसरात आज पहाटे मुसळधार पाऊस पडला. या पावसाने रस्ते जलमय झाले होते. धाराशिव शहर आणि परिसरातही मध्य रात्रीपासून पावसाच्या धारा कोसळत होत्या.