एकनाथ शिंदेची अभेद्य तटबंदी भाजपने भेदली; ठाण्यात शिवसेना फुटली, राज्यात खळबळ !

ठाणे : ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची चालती या भागात आहे. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गड. पण आता भाजपने एकनाथ शिंदेंची ही अभेद्य तटबंदीच भेदली आहे.

राज्यात शिवसेना वाढावी म्हणून लक्ष घालणाऱ्या एकनाथ शिंदेंना स्वत:च्या मतदारसंघातच जोरदार धक्का बसला आहे. त्यांच्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील एका शाखाप्रमुखांसह सुमारे ३०० शिवसैनिकांनी रविवारी भारतीय जनता पार्टीत प्रवश केला.ठाण्याचे पालकमंत्री असलेल्या शिंदे यांच्या मतदारसंघातील या घडामोडींमुळे शहर शिवसेनेत खळबळ माजली आहे.

किसननगर येथील शाखा क्रमांक दोनचे शाखाप्रमुख समीर नार्वेकर यांनी आपल्या इतर शिवसैनिकांसह प्रवेश केला. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे तसेच आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.विधानसभा मतदार संघातील युवा सेनेचे निरीक्षक नीलेश लोहोटे, उपशाखाप्रमुख पंकज परब, भरत देसाई, आशिष चव्हाण, नीतेश पवार यांच्यासह अन्य शिवसैनिकांचा यात समावेश आहे.