काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजपा, आरएसएसची विचारधारा द्वेष पसरवणारी – राहुल गांधी

वर्धा : देशात दोन विचारधारा आहेत, एक काँग्रेसची तर दुसरी आरएसएस, भाजपची. काँग्रेसची विचारधारा ही खूप जुनी विचारधारा असून ती सर्वांना जोडणारी आहे तर आरएसएस व भाजपाची हिंदुत्वाची विचारधारा विभाजनवादी, व्देष पसरवणारी आहे. असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या देशभरातील प्रमुख प्रतिनिधींचे सेवाग्राम येथे चार दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ राहुल गांधी यांच्या ऑनलाइन संबोधनाने झाला.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात हजारो वर्षांपासून असलेली विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा आहे. महात्मा गांधी यांनी त्याचाच अवलंब केला आणि त्याच मार्गावरून काँग्रेस मार्गक्रमण करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसचे आदर्श वेगवेगळे आहेत. आरएसएस व भाजपाचे आदर्श सावरकर आहेत तर काँग्रेसचे आदर्श महात्मा गांधी आहेत. पूर्वी काँग्रेस कार्यकर्ते पक्षाची विचारधारा समजून घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचवत होते पण त्यात थोडा खंड पडलेला दिसतो आहे, त्याला काही कारणे आहेत.

आता मात्र पुन्हा नव्या जोमाने काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवायची गरज आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पसरवायची आहे, जनतेला समजवायची आहे. काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता, नेता तो कितीही ज्येष्ठ श्रेष्ठ असला तरी त्याला प्रशिक्षण अनिवार्य केले पाहिजे. जेव्हा दहशतवाद, कलम ३७०, राष्ट्रीयता या मुद्यांवर चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यावर संपूर्ण माहिती असली पाहिजे. त्याला ती लोकांसमोर व्यवस्थित मांडता आली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करणे गरजेचे आहे.

काही लोक काँग्रेस पक्ष सोडून भाजपामध्ये जातात पण ते तिथे राहु शकत नाहीत. भाजपा, आरएसएस हे फक्त वापर करुन घेतात. तिथे सन्मान, प्रतिष्ठा मिळत नाही असे काँग्रेसमधून भाजापात गेलेले व परत काँग्रेसमध्ये आलेले लोक सांगतात. भितीपोटी काही लोक भाजपात जातात पण तेथे ते फारकाळ जगू शकत नाहीत. ज्याप्रमाणे महादेवाने विष गिळंकृत करून संपवले त्याच प्रकारे काँग्रेसची विचारधारा भाजपच्या विखारी विचारधारेला गिळंकृत करून संपवेल. आज सगळीकडे जो द्वेष पसरवला जात आहे.

वातावरण विखारी केले जात आहे, हे चित्रही बदललेले दिसेल. काँग्रेसची विचारधारा गावखेड्यापर्यंत तळागाळातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आधी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनातील दुःख व भीती दूर करणे गरजेचे आहे. त्यांच्या मनातील भीती व दुःख दूर करून त्यांना लढण्यासाठी सज्ज करा. भाजपा व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक मूलभूत फरक आहे आणि तो म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावर नेहमी उत्साह व आनंद दिसतो तर भाजपा कार्यकर्त्यांचे चेहरे रागीट व भयग्रस्त दिसतात.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य सचिन राव म्हणाले की, काँग्रेस पक्षाने स्वराज्य आणि सर्वोदयाचा मार्ग दिला त्यावरच आज हल्ला केला जात आहे. धर्मांध, हुकुमशाही वृत्तीचे लोक यावर हल्ला करून विभाजनवादी राजकारण केले जात आहे हे अत्यंत घातक आहे. संपूर्ण काँग्रेस पक्ष याविरोधात संघर्ष करत आहे. प्रशिक्षण हा या संघर्षातील सर्वात महत्वाचा भाग आहे. इथून संकल्प करून आपल्याला पुढे जायचे आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख सचिन राव यांनी केले तर सूत्रसंचालन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

या प्रशिक्षण शिबिराचा समारोप १५ तारखेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

हे देखील पहा