‘पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच’

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park)पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर तसेच महाविकास आघाडीला देखील फैलावर घेतले. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीच्या ढोंगीपणाचा अक्षरशः बुरखा फाडला.

ठाकरे म्हणाले,  विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पहाटे जोडा वेगळाच पाहायला मिळाला. पळून कुणाबरोबर गेले अन् लग्न कुणाबरोबर केले, काही कळेनाच, असे म्हणत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर तेवढ्यात आवाज आला हे लग्न नाही होणार… अन् फिस्कटलं. दोघेही हिरमसून घरी…हे सगळं सुरु असताना वेगळेच सुरु होते. कुणीतरी मला कडेवर घ्या ना… असे म्हणतेय. तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय… महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये असा प्रकार पाहिला नाही. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता? एकमेंकाना शिव्या घालता अन् पुन्हा मांडीला मांडी लावून बसता? असे म्हणत त्यांनी  महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

जातीवादाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलाय. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद फोफावला. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. या आधी जात नव्हती का तर होती. पण त्यावेळी जातीचा अभिमान होता. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष करायला लावला गेला’, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केलाय.