उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा

मुंबई : अधिवेशन काळात मोठ्या प्रमाणावर विधान भवनात येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृह, पत्रकारांसाठी विशेष बैठक व्यवस्था, पॅसेज सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग तपासणी यंत्रणा,भरारी पथक, वायरलेस यंत्रणा,अग्निशमन यंत्रणा, पिण्याचे पाणी, गाड्यांची पार्किंग व्यवस्था,आपत्ती व्यवस्थापन सारख्या अनेक विषयांची काटेकोर तयारी बाबत आढावा बैठक आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज विधान भवनात घेतली.आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधानभवन येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सर्व अधिकाऱ्यांना वरील प्रमाणे सूचना दिल्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, विधीमंडळाकडे प्रलंबित आयुधांची व प्रश्नांची उत्तरे संबंधित विभागाकडून घेण्यासाठी पाठपुरावा करावा. खानपान सेवा अधिक काळजीपूर्वकरित्या देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दररोजची कामकाज दिनदर्शिका वेळेत उपलब्ध करावी. महिला अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे असावीत, अनेक दालनांमध्ये असलेला घनकचरा उठाव वेळेवर करावा, बाथरूम स्वच्छ राहतील याबाबत सातत्याने पाठपुरावा करावा, अशा ही सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केल्या.

दोन्ही सभागृह आणि विधान भवन परिसरात अखंड वीज, स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा, आपत्ती व्यवस्थापन बाबत जाहीर परिपत्रक दिसेल असे लावावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली.

आरोग्य विभागाने दक्षतेने हिरकणी कक्षाची देखरेख करावी. त्या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू आधीच उपलब्ध करून ठेवाव्यात असे त्यांनी सांगितले. विधानभवनातील वैद्यकीय कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.