सरकारने ओबीसी समाजाचा घात केला; न्यायालयाच्या निकालानंतर राजू पाटलांचा हल्लाबोल

मुंबई – OBC आरक्षणप्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) दणका दिला असून दोन आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका आहे.

दोन आठवड्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिल्याने आता 18 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांचं बिगुल ओबीसी आरक्षणाशिवाय वाजणार हे जवळपास निश्चित झाले आहे. पुढील दोन आठवड्यातच जवळपास १८ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे.

दरम्यान,  अद्याप प्रभाग रचना पूर्ण झालेली नाही त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. दोन आठवड्यात निवडणुका जाहीर झाल्या तर या निवडणुका ऐन पावसाळ्यात घ्याव्या लागणार आहेत.

दरम्यान, या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याबाबत भाष्य केले असून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले,  राज्य सरकार #OBC आरक्षणाबद्दल पहिल्यापासूनच चालढकल व हलगर्जीपणा करत होते. आजचा ओबीसी आरक्षणाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हे ठाकरे सरकारचे अपयश आहे की इच्छा ? सरकारने ओबीसी समाजाचा घात केला. निषेध ! असं त्यांनी म्हटले आहे.