राज्यसभा निवडणूक : एनडीए जिंकणार सर्वाधिक जागा, जाणून घ्या आहेत युपी, बिहार आणि महाराष्ट्रातील समीकरण

नवी दिल्ली – संसदेच्या वरिष्ठ सभागृहासाठी म्हणजेच राज्यसभेसाठी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर केले जात असून, अधिकाधिक जागा मिळविण्याची समीकरणेही मांडली जात आहेत. भाजप लवकरच राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करू शकते. उत्तर प्रदेशातील आठ उमेदवारांची यादी, बिहारमधील दोन उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तर महाराष्ट्रातूनही दोन उमेदवारांची यादी जारी केली जाणार आहे. तिसऱ्या उमेदवाराबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही.

यूपीमध्ये सर्वाधिक जागा एनडीएच्या 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार स्थापन केले आहे, त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की यूपीमध्ये पुन्हा एकदा राज्यसभेसाठी सर्वाधिक जागा एनडीएच्या आहेत.त्यामुळे यावेळी एनडीए 11 पैकी 8 जागा सहज जिंकताना दिसत आहे. यूपीमधील भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या पॅनेलमध्ये जफर इस्लाम, शिव प्रताप शुक्ला, संजय सेठ, सुरेंद्र नागर, जयप्रकाश निषाद, लक्ष्मीकांत वाजपेयी आणि माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा या नावांचा समावेश आहे. सपा आघाडीलाही तीन जागा मिळू शकतात, मात्र यावेळी बसपा आणि काँग्रेसच्या खात्यात एकही जागा जात नसल्याचे दिसत आहे. सपाने माजी ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल, सपाचे माजी राज्यसभा सदस्य जावेद अली आणि राष्ट्रीय लोकदल प्रमुख जयंत चौधरी यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

बिहारची स्थिती

बिहारमधून राज्यसभेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. याठिकाणीही पक्षांनीआपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भाजप येथून ब्राह्मण आणि मागासवर्गीय उमेदवाराला जागा देण्याच्या मनस्थितीत आहे. ब्राह्मण चेहरा सतीश दुबे आणि दुसरा ओबीसी उमेदवार असेल. बिहारमध्ये कमी जागांमुळे नितीश कुमार यांच्या जेडीयूला यावेळी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागणार आहे. जेडीयूकडून तिकिटाचे प्रमुख दावेदार केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह आहेत, त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. जेडीयू कोणाला उमेदवार देणार याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

महाराष्ट्राची स्थिती

महाराष्ट्रात भाजपकडे दोन जागा जिंकण्याइतपत संख्याबळ आहे. पियुष गोयल यांचे एक नाव जवळपास निश्चित झाले आहे. पियुष गोयल यांना दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते, असेही होऊ शकते. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस स्वतंत्रपणे एका उमेदवाराला विजय मिळवून देऊ शकतात, मात्र तिघांच्या युतीमुळे ते दुसरा उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतात. या संख्याबळामुळे शिवसेनेने दोन जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून, याला राष्ट्रवादीनेही मान्यता दिली आहे.