प्रकाश आंबेडकरानी औरंग्याचे उदात्तीकरण केले, आता खैरे-दानवेंची दातखीळ का बसली?  

छत्रपती संभाजीनगर : अहमदनगर येथे औरंगजेबाचे पोस्टर दाखविल्याने उडालेला गोंधळ, राज्यात या कारणामुळे होणाऱ्या दंगली या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथील भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शनिवारी भेट दिली. या भेटीमुळे सर्वच स्तरातून अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत.

भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी या मुद्द्यावरून ठाकरे गटाला खिंडीत पकडत टीका केली आहे. डॉ प्रकाश आंबेडकरानी संभाजीनगरात येवून औरंग्याच्या कबरीवर फुले वाहिली हे उदात्तीकरण राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांना मान्य का? कुठल्याही प्रश्नावर नाक उचलून बोलणारी हि मंडळी अता का गप्प? त्यांची दातखिळी बसली का? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूला भाजप नेते अजित चव्हाण यांनी याच मुद्यावरून टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी पापी औरंगजेबाच्या कबरी वरती जाऊन त्याला सलाम ठोकला आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा हा अपमान असून केवळ हिंदूच नाहीतर खोजा, शिया, अहमदिया, बौद्ध, जैन सर्वधर्म्यांच्या विरोधात असलेल्या औरंगजेबाचे  उदात्तीकरण होऊ शकत नाही.

परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाचं वाचन प्रकाश आंबेडकरांनी केलं तर मूलतत्त्ववाद्यांना पाठिंबा देणं किती धोक्याचा आहे याची प्रचिती त्यांना येईल केवळ मत मिळवण्यासाठी आपला वारसा विसरून अशा प्रकार करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान केला आहे असं चव्हाण यांनी म्हटले आहे.