समृद्धी नव्हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग : चेतन तुपे

Nagpur –  समृद्धी महामार्गाचे खरे नाव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे आहे. हे नाव अधिकृतपणे सर्वत्र यायला हवे. मात्र या महामार्गाचा उल्लेख फक्त समृद्धी महामार्ग असाच होत असताना दिसून येत आहे. हा प्रकार मुद्दाम होतो आहे का? बाळासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळण्यात येते आहे का अशी स्पष्ट विचारणा हडपसर चे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी विधानसभेत केली.

महामार्गाचे संपूर्ण नाव अगदी गुगल सर्च इंजिन, गुगल मॅप यावरही संपूर्ण नाव दिसत नाही. हे जाणूनबजून करण्यात येते आहे का असा सवाल अंतिम आठवडा प्रस्ताव यावर विधानसभेत बोलतांना त्यांनी केला. सर्च इंजिन आणि गुगल मॅपवर संपूर्ण नाव का नाही ?  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असा उल्लेख टाळणारे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत जे जाणीवपूर्वक बाळासाहेबांचे नाव येऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत याची दखल घ्यावी तातडीने कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

या महामार्गावर होणारे वाढते अपघात देखील चिंताजनक असल्याचे सांगून हा महामार्ग भाग्यरेषा आहे असे म्हणतात परंतु यावर काहींच्या जीवनरेषा कायमच्या संपल्या अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मदतीअभावी रुग्णवाहिकेची वाट पाहत दीड दोन तास अपघात ग्रस्तांना थांबावे लागते. वेळेवर सेवा उपलब्ध होत नाही. याची तातडीने दखल घ्यावी अशी विनंतीही त्यांनी सभागृहात केली.