‘१ अपक्ष महिला खासदाराने शिवसेनेच्या आमदार-खासदारांना रस्त्यावर उतरायला भाग पाडल… घाम काढला’

मुंबई – खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (MLA Ravi Rana) यांनी आज मातोश्री (matoshree) बाहेर हनुमान चालीसा (hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा दिला असून आक्रमक शिवसैनिकांमुळे मुंबईतील वातावारण चांगलेच तापले आहे. आज नऊ वाजताच राणा यांच्या खार (Khar) येथील निवासस्थानाबाहेर गर्दी केलेले शिवसैनिक बॅरिकेट्स तोडून इमारतीत घुसले आहेत.या आक्रमक शिवसैनिकांना रोखण्यात पोलीस सपशेल अपयशी ठरले.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवि राणा मातोश्री येथे जाण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती मिळत असून, सध्या शिवसैनिकांनी मातोश्री बरोबरच राणा यांच्या खार येथील बंगल्या बाहेरही गर्दी केली. गर्दी वाढत असून, पोलिसांचा फौजफाटा  त्या मानाने कमी आहे असं दिसतंय. सध्या राणा  यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरु आहे. पोलीस सध्या हतबल झाल्याचे दिसत असून  शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या खार येथील घराला वेढा घातला. शिवसैनिकांच्या सोबत सेनेचे अनेक नेते देखील रस्त्यावर उतरले आहेत.

दुसऱ्या बाजूला शुक्रवारी सकाळपासून पोलिसांबरोबरच शिवसैनिकही मातोश्री बाहेर पहारा देत आहेत. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाच्या भूमिकेवर राणा दाम्पत्य ठाम असून, मुख्यमंत्र्यांना दिलेलं आव्हान पुर्ण करणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  दरम्यान, मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी याबाबत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. १ अपक्ष आमदार आणि १ अपक्ष खासदार स्त्री ने शिवसेनेच्या ५६ आमदार आणि १८ खासदारांना रस्त्यावर उतरायला भाग पाडल… घाम काढला… अनिल देसाई सारखे घाम पुसत आहेत… विनायक राऊत वडापावची वाट बघत आहेत… आणि गर्दीत हरवलेल्या किशोरी पेडणेकरांना शिवसैनिक शोधत आहेत.. असं चिले यांनी म्हटले आहे.