राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मनुस्मृतीचेच समर्थक आहेत; कॉंग्रेसची जहरी टीका

मुंबई – मनोहर उर्फ संभाजी भिडे (sambhaji Bhide )यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Maharashtra Pradesh Congress Committee chief spokesperson Atul Londhe0 यांनी दिला आहे.

संभाजी भिडेंच्या विधानाचा जाहीर निषेध करुन अतुल लोंढे यांनी भाजपावरही तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कायद्याचे अभ्यासक आहेत, त्यांनी संविधान निट वाचावे म्हणजे त्यांना कळेल की १५ ऑगस्टला भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्वातंत्र्याची ती नांदी होती. जे स्वातंत्र्य मनुस्मृतीने या देशातील बहुजन समाजाला पाच हजार वर्षांपासून नाकारले होते. भाजपा व संघ विचाराच्या लोकांना अखंड भारतावर तर बोलण्याचा अधिकारच नाही.

शामाप्रसाद मुखर्जी यांनी अशा मुस्लीम लिग बरोबर युती केली होती ज्यांनी १९४० मध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली होती. तशी मांडणी सावरकर यांनीही केली होती, म्हणजे खरा इतिहास आता समोर येत आहे. तुम्ही संविधान दिवस काळा दिवस म्हणून पाळणार ? १९४८ मध्ये तिरंगा पायदळी तुडवला, यातून लक्षात येते की आपणास स्वातंत्र्य व संविधान मान्य नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा मनुस्मृतीचेच समर्थक आहेत, संपूर्ण बहुजन समाज व स्त्रीयांनी आपल्या पायाखाली राहिले पाहिजे अशी यांची मानसिकता आहे, अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो व संभाजी भिडेंवर लवकरात लवकर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असेही लोंढे म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने औरंग्याच्या अवलादी, औरंग्याच्या अलवादी करता. मग त्या गुणरत्न सदावर्तेच्या रुपाने गोडसेच्या औलादी, गोडसेचे फोटो जाहीरपणे नाचवत असतात, ते आपणांस चालते का ? आपल्यात धमक असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या या गोडसेंच्या प्रवृत्तींवरही कारवाई करा, असेही लोंढे म्हणाले.