संजय राऊत चवन्नी छाप आहेत, ते कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात – रवी राणा 

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर दुसऱ्या बाजूला नवनीत राणा यांना डिस्चार्ज  मिळण्यापूर्वी आमदार  रवी राणा(Ravi rana)  माध्यमांशी बोलले होते. यावेळी त्यांनी सुद्धा शिवसेनेवर टीका केली.

ते म्हणाले, जेव्हा पोलीस आमच्या घरी आले होते, तेव्हा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला चला तुम्हाला जामीन देण्यात येईल, असं सांगितलं. आम्ही वॉरंट मागत असतानाही त्यांनी तफकाफडकी आम्हाला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.गाडीत बसताना शिवसैनिकांनी आमच्यावर दगड, पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्याच्यावर कारवाई केली नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चहा पाजला. त्यानंतर रात्री सांताक्रूझला लॉकअपमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला पाणीसुद्धा दिलं नाही. उद्धव ठाकरे सरकार एका महिलेला घाबरल्याने त्यांनी एवढी सक्तीची कारवाई केली, असं रवी राणा म्हणाले होते.

‘मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचं आम्ही पालन करणार आहोत. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं कोर्टानं सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. मला असं वाटतं संजय राऊत चवन्नीछाप आहेत. संजय राऊत कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात,’ असं रवी राणा म्हणाले होते.