रोहितने विश्वचषकातील ‘हा’ विक्रम मोडीत काढत सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले

IND vs AFG:एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानने भारताला विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने सहज गाठले. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. याच सामन्यात भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma)  शानदार फलंदाजी केली. त्याने एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे.

भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 131 धावा केल्या. त्याने एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे. याशिवाय तो एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला आहे. रोहितच्या या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

रोहित शर्माने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 7 शतके झळकावली आहेत. रोहितने २०१५ च्या विश्वचषकात शतक झळकावले होते. यानंतर 2019 मध्ये रोहितने अप्रतिम फॉर्ममध्ये 5 शतके झळकावली. यानंतर 2023 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात रोहित खातेही न उघडता बाद झाला. पण पुढच्याच अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हा खेळाडू शतक झळकावून अप्रतिम फॉर्ममध्ये परतला. या प्रकरणात रोहितने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. विश्वचषकात सचिनच्या नावावर एकूण 6 शतके होती. रोहितने अवघ्या 19 डावात हा टप्पा गाठला. तर सचिनने 44 डावात 6 शतके झळकावली होती.

या सामन्यात रोहितने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. तो इथेच थांबला नाही, त्यानंतर त्याने अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावले. विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला आहे. त्याने कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कपिलने 1983 च्या एकदिवसीय विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 72 चेंडूत शतक झळकावले होते.