‘देश जेव्हा एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात’

अहमदनगर : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. युक्रेन देखील रशियाला चोख प्रत्युत्तर देत असल्याचे पहायला मिळत आहे. युक्रेनच्या एका शहरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या रशियन सैन्याच्या ताफ्यावर युक्रेन सैनिकांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात रशियाचे अनेक सैनिक गंभीर जखमी झाल्यचे वृत्त समोर येत आहे. रशियाकडून युक्रेनच्या कीव आणि खारिकव या दोन शहरांना लक्ष करण्यात येत आहे.

या पार्श्ववभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना करत मोदींवर निशाणा साधला आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेंव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेंव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेंव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं. असं रोहित पवार म्हणालेत.

रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय. असं देखील पवार म्हणालेत.

लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे.
भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात. अशी चिंता देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलीय.

तर, आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलंय.