‘तुमचं पटत नसेल तर..’ शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजितदादांवर उद्धव ठाकरेंनी ओढले ताशेरे

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज ६३वा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday). वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय घडामोडींवर परखड मत मांडले. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांना दिलेला निवृत्तीचा सल्ला, यावरही उद्धव ठाकरे बोलले.

बंडखोरी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या पहिल्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना वयावरुन सुनावले होते. पवारांचे वय झाल्याने त्यांनी आतातरी कुठे थांबाव, असं म्हणत अजित पवारांनी त्यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. आता उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना या विधानावरुन ऐकवले आहे.

“अजित पवारांनी केलेले विधान हे अत्यंत वाईट आहे. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्धार काढणे हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचे वक्तव्य मला आवडलं नाही. तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा की तुमचं पटत नाही. या वयातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिले त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणार हे मला पटलेले नाही”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.