ईएसआयसी रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 305 कोटी रुपयांचा निधी; माधुरी मिसाळ यांची माहिती

नागपूर : बिबवेवाडी येथील राज्य कामगार विमा योजनेच्या (ईएसआयसी, ESIC) रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 305 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून (एकूण प्रकल्पीय रक्कम 470 कोटी रुपये), त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी कळविली आहे.

मिसाळ म्हणाल्या,’पर्वती मतदार संघात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होते. बिबवेवाडी येथील ईएसआयसीच्या नऊ एकर जागेत ससूनच्या धरतीवर रुग्णालय व्हावे यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत असून, लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होईल.’

मिसाळ म्हणाल्या, ‘सर्व वैद्यकीय सोयींनीयुक्त सात मजल्यांच्या इमारतीत सुमारे 60 हजार चौरस फूट बांधकाम होणार आहे. तळमजल्यावर बाह्य रुग्ण कक्ष, दुसऱ्या मजल्यावर बाह्य आणि आंतररुग्ण सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, तीन ते सातव्या मजल्यापर्यंत साधारण ते अतिदक्षता विभागाचे कक्ष असतील. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांचा समावेश असणार आहे.’

पाचशे खाटांपैकी पन्नास खाटा सुपर स्पेशालिटी दर्जाच्या असणार आहेत. पुढील पाच वर्षांत विस्तारीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.