कोरोनानंतर आता Brain-Eating Amoebaचा प्रकोप, जाणून घ्या या खतरनाक आजाराची लक्षणे

जगभरात सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट (Covid-19) ने हाहाकार माजवला असताना आणखी एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियामध्ये ‘ब्रेन इटिंग अमिबा’चे (Brain-Eating Amoeba) पहिले प्रकरण समोर आले असून, त्यानंतर सर्वांचीच झोप उडाली आहे. हा आजार अत्यंत जीवघेणा असल्याचे सांगितले जात आहे. ‘ब्रेन इटिंग अमिबा’ लोकांच्या मेंदूचा नाश करतो. कोरिया डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन एजन्सी (KDCA) ने या आजाराची पुष्टी केली आहे.

KDCA ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व आशियाई देशात चार महिने घालवल्यानंतर 50 वर्षीय व्यक्ती 10 डिसेंबर रोजी कोरियाला परतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे गेल्या आठवड्यात मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. KDCA च्या म्हणण्यानुसार त्यांना Naegleria fowleri ची लागण झाली होती. हा एक आजार आहे जो मानवी मेंदूचा नाश करतो. याला ब्रेन इटिंग अमिबा म्हणतात.

ब्रेन इटिंग अमिबा आजाराची लक्षणे (Brain-Eating Amoeba Symptoms)
डोकेदुखी
ताप येणे
मान अकडणे
भूक न लागणे
उलट्या होणे
चव कमी होणे
दौरे येणे
अशक्तपणा
कमी दिसणे
मतिभ्रम

ब्रेन इटिंग अमिबा कुठे आढळतात?
तलाव
नद्या
कालवा
ओढा
संथ वाहणाऱ्या नद्या
खड्डा
मत्स्यालय
वॉटर पार्क
कमी पाण्याचे स्विमिंग पूल
विहिरीच्या पाण्यात

नाकाद्वारे मेंदूत करतो प्रवेश
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, ब्रेन इटिंग अमिबा नाकातून शरीरात आणि नंतर नाकातून मेंदूमध्ये प्रवेश करू शकतो. हे टाळण्यासाठी, नदी किंवा तलावात आंघोळ करताना नाक प्लगचा वापर करणे आवश्यक आहे. जेव्हा अमिबा शरीरात प्रवेश करतो, त्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी सुमारे 15 दिवस लागतात. त्याच वेळी, लक्षणे दिसल्यानंतर 3 ते 7 दिवसांनी संक्रमित रुग्णाचा मृत्यू होतो.

केडीसीएने म्हटले आहे की, नेग्लेरिया फॉउलरीचा मानव-ते-मानवी प्रसार होण्याची शक्यता कमी आहे, परंतु स्थानिक रहिवाशांना रोग पसरलेल्या भागात प्रवास करणे टाळण्यास सांगितले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अमेरिका, भारत आणि थायलंडसह जगभरात 2018 पर्यंत Naegleria fowleri चे एकूण 381 प्रकरणे नोंदवली गेली.

(नोट- हा लेख सामान्य माहितीसाठी आहे, कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)