Andheri By-poll: भाजपला उशिरा आलेले शहाणपण… रुपाली पाटील यांनी साधला निशाणा

Mumbai: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) सोमवारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूकीत राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दरम्यान, या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी भाजपच्या या निर्णयाला उशीरा आलेले शहाणपण असे म्हटले आहे. तसेच अशा नीच वृत्ती राजकारणाची पुनरावृत्ती नको, अशा शब्दांत भाजपवर खरपूस टीकाही केली आहे. शिवाय ऋतुजा लटके यांना राजीनाम्यावरून झालेल्या त्रासाचाही उल्लेख केला आहे.

“अंधेरी पोटनिवडणुकित भाजपने माघार घेतली. उशिरला आलेले शहाणपण देवा पाहतोय ना, तरीही शिवसेनच्या लटके वहिनीला जो त्रास दिला तो कायम स्मरणात राहील. परत अशा घटना नको, नीच वृत्ती राजकारण नको. जनता मायबाप आहे, त्यांच्या पुढे काही चालणार नाही लक्षात ठेवावे,” असे ट्वीट करत रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

तसेच कर्जत-जामखेडचे आमदार व राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांचीही प्रतिक्रिया पुढे आली आहे. “अंधेरी पूर्व संदर्भात लवकर निर्णय झाला असता तर राजीनामा मंजूर करण्यासाठी तसंच चिन्हा संदर्भातही झालेला खटाटोप टाळता आला असता. असो! शेवटी का होईना, जाग आली हे महत्वाचं आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.