ऐतिहासिक सिनेमा बापजन्मात करणार नाही; ‘हर हर महादेव’वरुन सुरू असणाऱ्या वादादरम्यान सुबोध भावेचा मोठा निर्णय

कोल्हापूर: ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्यापुढील अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हा चित्रपट टीव्हीवरही प्रदर्शित झाला असून त्याला स्वराज्य संघटनांकडून विरोध दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केलेल्या अभिनेता सुबोध भावे याला स्वराज्य संघटनांकडून दोन दिवसांत माफीनामा देण्याचा इशाराही स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.

यानंतर अभिनेता सुबोध भावे (Actor Subodh Bhave) याने मोठे पाऊल उचलले आहे. आपण इथून पुढे कधीही ऐतिहासिक सिनेमात काम करणार नसल्याचे ठाम मत त्याने मांडले आहे.

हर हर महादेव (Har Har Mahadev Controversy) या सिनेमात चुकीचा इतिहास दाखवला गेल्याने हा सिनेमा वादाच्या कचाट्यात सापडला आहे. या चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे शनिवारी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापुरात होता. त्यावेळी स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आणि चित्रपटाबद्दल असलेल्या आक्षेपाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी शिवभक्तांनी केली. यावेळी ‘हर हर महादेव’बाबत दोन दिवसांत दिग्दर्शकांकडून माफीनामा न आल्यास चालू शूटिंग बंद पाडू, असा इशाराही सुबोधला देण्यात आला.

यावेळी सुबोध भावे म्हणाले की, या सिनेमात मी केवळ एक कलाकार म्हणून काम केलं. मी मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करत राहीन. पण इथून पुढे कोणत्याही ऐतिहासिक सिनेमात कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही, असेही त्याने म्हटले.