शाहू – फुले – आंबेडकर यांच्या समाजाला पुढे नेण्याच्या दुरदृष्टीच्या सुत्रावरच पक्ष काम करतोय – शरद पवार

मुंबई – शाहू – फुले – आंबेडकर यांची दूरदृष्टी समाजाला पुढे नेण्याची होती त्यांच्या या दुरदृष्टीच्या सुत्रावरच आमचा राष्ट्रवादी पक्ष काम करतोय असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.काल नेहरू सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

आमचा पक्ष एका विचाराने देशात आणि राज्यात काम करतोय. बांधिलकी असलेले कार्यकर्ते पक्षात आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी झटणारा पक्ष आहे असेही शरद पवार म्हणाले. लिहिणारे, वाचणारे, अभ्यास करणारे, लिखाण करणारे लोक सध्या फार आहेत. दिनदुबळ्यांचं, पददलितांचं, वंचितांचं दुःख ऐकून आमच्या पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो असेही शरद पवार यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कितीतरी पुढचा विचार त्यावेळी केला होता. बाबासाहेबांची दृष्टी घटनेच्या पुढची होती. देशातील मोठया धरणातून शेती व वीज निर्मिती केली पाहिजे हा विचार त्यांनी अगोदर मांडला होता याची माहितीही त्यांनी दिली.

समाजकारण, राजकारण बदलत आहे परंतु महात्मा फुले यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले. आपल्या भाषणात शरद पवार यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती दिली. तर इतर घटनांचा उहापोहही यावेळी केला.