चार पैशांसाठी क्रिकेटपटू पान मसाल्याची जाहिरात करतात… माजी क्रिकेटर्सवर गौतमची ‘गंभीर’ टीका

भारताचा माजी सलामीवीर आणि लखनऊ सुपर जायंट्स आयपीएल फ्रँचायझीचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांने माऊथ फ्रेशनर्स ‘पान मसाला’ ब्रँडची जाहिरात केल्याबद्दल काही माजी क्रिकेटपटूंवर टीका (Cricketers in Pan Masala Ad) केली आहे. त्याच्या मते, तरुण चाहत्यांनी त्यांचे आदर्श हुशारीने निवडले पाहिजेत. कारण सुनील गावसकर, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल आणि कपिल देव असे काही क्रिकेटपटू आहेत जे विषारी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांच्या आणि ब्रँडच्या जाहिरातींमध्ये दिसतात.

गौतम गंभीरने न्यूज 18 इंडियाला सांगितले की, “हे अत्यंत घृणास्पद आहे. कारण मी माझ्या आयुष्यात कधीही विचार केला नाही की एखादा खेळाडू पान मसाला जाहिरात करेल. हे खूप निराशाजनक आहे. तरुणांनी खूप काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक त्यांचे क्रिकेटमधील आदर्श निवडले पाहिजेत. आदर्श क्रिकेटपटू निवडण्यासाठी नाव महत्त्वाचे नाही, त्यांची कृती महत्त्वाची आहे. मग तो कोणीही असो.”

“कोट्यवधी तरुण तुम्हाला पाहत आहेत आणि तुम्ही कोणत्याही पान मसाल्याची जाहिरात करता. पैसा महत्त्वाचा नाही. पैसे कमवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. जरी एखाद्याला पैसे कमवण्याच्या काही संधी सोडाव्या लागल्या तरी चालतील. कारण तुम्ही देशातील लाखो तरुणांचा आदर्श आहात. म्हणूनच अशा ऑफर नाकारण्याचे धैर्य असले पाहिजे,” अशा शब्दांत गंभीरने पान मसाल्याची जाहिरात करणाऱ्या क्रिकेटपटूंचे कान टोचले.