“भिडे औरंगाबादमध्ये आले तर ते परत कसे जातात ते आम्ही पाहतोच”, ठाकरे गटाचा इशारा

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

अशातच संभाजी भिडे यांचा आज छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भिडे यांचा औरंगाबाद शहरात कार्यक्रम झाल्यास तो हाणून पाडू असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने भिडे यांच्या कार्यक्रमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे औरंगाबादमध्ये आले तर ते परत कसे जातात ते आम्ही पाहतो, असा इशाराच ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे.

ठाकरे गटाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भिडेंचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. “अशा नालायक माणसाचं तुम्ही मार्गदर्शन तरी कसं ठेवता. त्यामुळे आयोजकांना देखील पोलिसांनी तंबी दिली पाहिजे. भिडे यांच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचा विरोध असून शिवसेना यासाठी सर्वात पुढे असेल. जर संभाजी भिडे आज शहरात आले, तर शिवसेना स्टाईल त्यांना उत्तर देण्यात येईल. तसेच संभाजी भिडे शहरात आले तर परत कसे जाणार हे आम्ही पाहतो,” असा थेट इशारा घोडेले यांनी दिला आहे.