कोट्यवधी खर्च करुन समुद्रामध्ये स्मारक उभारणे निव्वळ बेशरमपणा; संभाजी भिडेंचं विधान चर्चेत

पुणे- मागील अनेक वर्षांपासून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अश्वारुढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या प्रकल्पावर काम सुरु आहे. या प्रकल्पासाठी अद्यापही निविदा निघालेली नाही. अशातच अरबी समुद्रात होऊ घातलेल्या शिवस्मारकाबद्दल शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन समुद्रामध्ये स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नये, असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. जुन्नर येथे आयोजित गडकोट मोहिमेच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

“आपल्याकडे आधीच खूप पुतळे आहेत. त्यात आणखी अरबी समुद्रात महाराजांचा पुतळा उभा करु बेशरमपणा करु नये. राज्यात सरकारं उलथी-पालथी होत आहेत. तो त्यांचा धंदा असला तरी दोन्हीही आपलेच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपण पुढे जात राहिलं पाहिजे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं फक्त सोहळे करुन चालणार नाही. तर त्यांना होकायंत्र समजून चाललं पाहिजे”, असं संभाजी भिडे म्हणाले.