ब्राह्मण समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक; परशुराम सेवा संघाच्या शिष्टमंडळाने घेतली शिंदेंची भेट

पुणे : ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सकारात्मक असून काल त्यांच्या पुणे दौऱ्या दरम्यान परशुराम सेवा संघाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रामुख्याने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या अमृत संस्थेचे कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावे. या संस्थेस भरीव निधी दिला जावा. तसेच देवस्थान इनाम जमिनी गेली शेकडो वर्षे ब्राह्मणांकडे आहेत; तरीही त्यांना कायदेशीर पक्क व अधिकार मिळत नाहीत, या संदर्भात महसूल मंत्री माना राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांसह एक बैठक घेतली होती व त्यावेळी सदर प्रश्नावर एक कायदा करून हा प्रश्न सोडवता येईल असे ठरले होते. असा कायदा येथे अधिवेशनात प्रस्तावित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यावेळी विनंती केली त्यावर अधिकाऱ्यांशी बोलून सकारात्मक निर्णय करू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे, कार्याध्यक्ष उपेंद्र जपे, प्रदेश उपाध्यक्ष माधुरीताई पाठक, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, कायदेशीर सल्लागार ऍड प्रसन्न कुमार जोशी, ध्यास प्रतिष्ठानचे सोमनाथ पाटील, आरपीआय ब्राह्मण आघाडीचे ऍड मंदार जोशी, ऍड अर्चिता मंदार जोशी, परशुराम सेवा संघाचे सदस्य प्रमोद मोहरीर, दत्तात्रय देशपांडे, सुनील कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, भगवान ठोंबरे, दीपक देवळे, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.