राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा; नाराज असल्याचे सांगत आमदाराने फोन केला बंद

Mumbai – विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चारही पक्ष आपआपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीनं पार पडणार आहे.

दरम्यान, आकडेवारीचं गणित पाहता महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे या लढाईतून कोण बाहेर पडणार याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. अश्यातच राज्यसभेला भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली. त्यानंतर आता पुन्हा एकदा मविआला आम्ही चितपट करू असा चंग देवेंद्र फडणवसांनी बांधला आहे. दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसही या सामन्यासाठी विशेष तयारीनिशी सज्ज झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (ncp mla dilip mohite patil) यांनी आपण नाराज असल्याचे सांगून फोनच बंद केला आहे. तसंच राष्ट्रवादीचे आणखी दोन आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत. दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल न झाल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. पण, खुद्द दिलीप मोहिते पाटील यांनी आपण नाराज असल्याचे सांगितलं आहे. मी अजूनही नाराज आहे. आम्ही सांगितलेली कामं बोलुनही होतं नाही, असं म्हणत खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नाराजीला वाट मोकळी करून देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिलीप मोहिते पाटील हे अजूनही खेडमध्येच आहे, ते अद्यापही मुंबईत दाखल झाले नाही. त्यांना मुंबईत मतदानाला दाखल होणार का असं विचारलं असता, त्यांनी फोन बंद केला आहे. आता दिलीप मोहिते पाटील हे नॉट रिचेबल झाले आहे. त्यामुळे दिलीप मोहिते पाटील मुंबईत दाखल होणार का प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

राज्यसभा निवडणुकीवेळी सुद्धा मोहिते पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली होती. आता विधान परिषद निवडणुकीच्या मतदानावेळी दिलीप मोहिते पाटलांचे नाराजी नाट्य रंगणार असं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते अद्याप मुंबईत पोहोचलेले नाही. तर आशुतोष काळे हे सुद्धा मुंबईत अद्याप पोहोचले नसल्याचे वृत्त आहे. मात्र, हे तिन्ही आमदार मतदान प्रक्रिया पार संपण्याच्याआधी मुंबईत पोहोचतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.न्यूज 18 लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे.