आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल; राणेंची थेट शरद पवारांना धमकी

मुंबई : – शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena Minister Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काल महाविकास आघाडी (MVA) वाचण्याकरिता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा मैदानात उतरले.आमदारांनी बंड केल्यास कार्यकर्ते त्यांच्यामागे जात नाहीत. शिवसैनिक मात्र कायम नेतृत्वाच्या पाठीमागे उभे राहतात. बंडखोरांना पराभूत करण्यासाठी शिवसैनिक जीवाचं रान करतात, हा आतापर्यंतचा इतिहास आहे, असा उघड उघड इशाराच  पवार यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिला. गुवाहाटीत बसून बहुमत सिद्ध होत नाही. त्यासाठी मुंबईत या, असंही पवार म्हणाले.

पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी पवारांना धमकी दिली आहे. आमदारांच्या केसाला धक्का लावाल तर घर गाठणं कठीण होईल, अशा शब्दात राणेंनी पवारांना लक्ष्य केलंय. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर नारायण राणेंनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये राणे म्हणतात की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.

 

 

 

आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. असं देखील राणे म्हणाले आहेत.