शिवसेनेने सुरक्षित जागेवर संभाजीराजेंना तर सहाव्या जागेवर संजय राऊत यांना उमेदवारी द्यावी – दानवे

औरंगाबाद : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना (Shiv Sena) पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. यानंतर आता शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.दरम्यान, यावरून भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे(Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेकडून संभाजीराजेंना अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना दानवे म्हणाले की,राज्यसभेच्या साहव्या जागेचा निर्णय भाजपने केलेला नाही.आमच्या संसदीय बोर्डाची बैठक होईल त्यात हा विषय चर्चेला जाईल. संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही. त्यामुळे संभाजीराजेंना ते उमेदवारी देणार आहेत की नाही आम्हाला माहित नाही. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधावे त्यांनतरच त्यांना उमेदवारी देऊ असं मी माध्यमात पाहिले. ते संभाजीराजे आहेत त्यामुळे त्यांना निवडणुकीत न उतरवता राष्ट्रपती कोठ्यातून सन्मानपूर्वक खासदारकी देण्यात यावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती आणि आम्ही त्यांना त्यावेळी खासदारकी दिली असं दानवे म्हणाले. तर शिवबंधन बांधा असे सांगून संभाजीराजेंना अडकवण्याचा शिवसेनकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला.

शिवसेना संभाजीराजेंना अडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण शिवसेनेला राजेंचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या सुरक्षित जागेवर त्यांना उमेदवारी देण्यात यावी आणि सहाव्या जागेवर संजय राऊत यांना उमेदवारी देण्यात यावी असं दानवे म्हणाले. तर भाजपकडून संभाजीराजेंबाबत काही विचार केला जाणार का? यावर बोलताना दानवे म्हणाले की, राज्यसभेच्या जागेंबाबत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होणार आहे. त्यांनतर काय चर्चा होईल त्यानुसार आम्ही ठरवू असेही दानवे म्हणाले.