संभाजीराजेंबद्दल आम्हाला आदर आहे, मात्र आमचा पाठींबा शिवसेनेच्या उमेदवारालाच – पटोले

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांना शिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना (Shiv Sena) पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. शिवसेनेच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे पाठ फिरवली असून आज पहाटेच ते कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत. हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संधी देण्याची संभाजीराजे यांच्याकडून मागणी झाल्याची माहिती आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडी यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

याबाबत बोलताना कॉंग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, संभाजीराजे आणि शिवसेनेची ऑफर हा शिवसेनेचा विषय आहे. त्यावर आम्ही बोलण्याचा प्रश्न नाही. शिवसेनेच्या वतीने ते जो उमेदवार देतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल. संभाजीराजेंबद्दल आम्हाला आदर आहे. आता उमेदवार निश्चित करण्याचा अधिकार शिवसेनेचा आहे. मागच्यावेळी हा अधिकार राष्ट्रवादीला दिला होता. यावेळी शिवसेनेचा आणि पुढच्यावेळी काँग्रेसचा अधिकार असेल.