‘मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता, हे नाना पटोले यांना आठवतंय तरी का?’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरु आहे. एका बाजूला हे दोन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत असताना आता कॉंग्रेस (Congress) आणि शिवसेनेत (ShivSena) देखील संघर्ष सुरु होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) अनेक वर्ष काँग्रेसचा महापौर होता, त्यावेळी कधीच मुंबई पाण्याखाली गेली नाही, असं म्हणत खोचक टोला काल शिवसेनेला लगावला आहे.

यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले यांच्या मुंबईतील प्रभागरचनेच्या आक्षेपावर आणि मुंबई तुंबण्याच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले की, मुंबईत काँग्रेसचा महापौर कधी होता हे नाना पटोले यांना तरी आठवतं का? त्यांनी काँग्रेसचा अभ्यास केला पाहिजे. अजूनही काही गोष्टी त्यांच्या अभ्यासातून सुटल्या आहेत.

काँग्रेसच्या वाढीबद्दल आम्हालाही आस्था आहे. एकेकाळी काँग्रेसचं मुंबईवर राज्य होतं पण तेव्हा मुंबई काँग्रेसला नेतृत्व होतं. पण मुंबईचा राजा शिवसेनाच आहे, त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. मुंबई कधी तुंबली याची माहिती हवी असेल तर शिवसेनेच्या संदर्भ विभागातून मी पाठवतो, असंही राऊत म्हणाले.