केतकी चितळेच्या वयाचा विचार करता वॉर्निंग देऊन या गोष्टींना पूर्णविराम द्यावा- मुंडे

मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर फेसबुक पोस्ट (Facebook post) केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिच्या विरोधात राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  नुकतेच केतकी चितळे  हिला तीन दिवसाची पोलिस कस्टडी दिल्यानंतर  पुन्हा कोर्टात सादर केले होते यावेळी कोर्टाने केतकी चितळे तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळे यांच्या विरोधात मुंबई गोरेगाव येथे देखील गुन्हा दाखल आहे. याच पार्श्वभूमीवर केतकी चितळे यांचा ताबा आज गोरेगाव पोलीस घेणार आहेत.

काल संध्याकाळी वेळेअभावी गोरेगाव पोलिसांना केतकी चितळेचा ताबा घेता आला नव्हता. त्यामुळे केतकी चितळे हिला कालची रात्र ठाणे कारागृहातच काढावी लागली होती. तर आज केतकी चितळेचा ताबा गोरेगाव पोलीस घेणार आहेत.

एका बाजूला या घडामोडी घडत असताना आता केतकीच्या वयाचा आणि आणि सगळ्या बाबींचा विचार करता तिला वॉर्निंग देऊन या गोष्टींना पूर्णविराम द्यायला हवं, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केलं आहे. एखाद्याने सोशल मीडियावर (Social Media) काय लिहावं हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असला तरी सर्वांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे. टीकासुद्धा अशी करावी, ज्यात बीभत्सपणा नसावा असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

आम्ही लहानपणापासून राजकारण पाहिलं आहे. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, लोक पेपरमधून लिहायचे. तरीसुद्धा काहीवेळा भाषा घसरायची. आम्ही मुंडे साहेबांना तेव्हा विचारायचो की, हे कसं सहन करता? त्यावर हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असं ते सांगायचे. पण आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या वेगळ्या पद्धतीने केली जात आहे, असं म्हणताना पंकजा यांनी केतकीच्या वयाचा विचार करून तिला वॉर्निंग देऊन या गोष्टी संपवाव्यात असं म्हटलं.