संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; राजा ठाकूरच्या पत्नीची थेट पोलिसात तक्रार

ठाणे- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. अशातच आता संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी ठाण्यातील राजा ठाकूर याला दिली असल्याची धक्कादायक माहिती संजय राऊत यांनी पत्राद्वारे दिली आहे. त्यांनी हे पत्र उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व ठाणे पोलिस आयुक्तांना लिहिले आहे.

अशातच राजा ठाकूरच्या पत्नीने (Raja Thakur Wife) संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. राजा ठाकूरला गुंड संबोधल्याने पत्नी पूजा ठाकूर यांनी कापूर बावडी पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर पूजा ठाकूरांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं की, “संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड संबोधित केल्याने तक्रार दाखल केली. माझ्या पतीला गुंड बोलणारे संजय राऊत कोण आहेत. त्यांच्याकडे काय पुरावा आहे. कोणीतरी तुम्हाला संपर्क केली आणि तुम्ही वक्तव्य करत आहात, त्याला अर्थ नाही.”

तुम्ही पुरावे आणि सर्व गोष्टी समोर आणा. संजय राऊतांविरुद्ध आयीपीसी कलम २११ आणि कलम १२० ब अंतर्गत अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी,” अशी मागणी पूजा ठाकूरांनी केली आहे.