राष्ट्रवादी पक्ष गोडसेच्या विचारांचा झालाय का ?, काँग्रेसच्या नेत्याने डागली तोफ

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये भूमिका साकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडूनच त्यांना विरोध होऊ लगाला आहे. हा सिनेमा महिना अखेरिस प्रदर्शित होणार आहे. मात्र, या अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आता राज्यात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने देखील अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीला फटकारले आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कुणाल राऊत यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोल्हे यांनी व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. यामुळे महात्मा गांधी समर्थक आणि  काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष या नात्याने या भूमिकेबद्दल मी खासदार कोल्हे यांचा निषेध करतो. अमोल कोल्हे यांनी आपली विचारधार बदलली आहे की, राष्ट्रवादी हा पक्ष गोडसेच्या विचारांचा झाला आहे. याचे स्पष्टीकरण कोल्हे यांनी द्यावे  असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, या वादात आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी उडी घेतल्याचे पहायाल मिळत आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून तर अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचे समर्थन देखील करण्यात आले. कोल्हे यांनी नथुराम गोडसे याची केवळ भूमिका केली आहे. भूमिका करणे म्हणजे विचारांना समर्थ होत नसल्याचा युक्तीवाद देखील मांडला जात आहे.