भारताच्या दुर्लक्षित क्रिकेटर संजू सॅमसनला आयर्लंडकडून खेळण्याची ऑफर, पण त्याच्या उत्तराने जिंकले हृदय

भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभाशाली यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याला जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये. त्याने २०१५ मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु आतापर्यंत तो केवळ बोटावर मोजण्याइतके सामने खेळू शकला आहे. त्याला सातत्याने दुर्लक्षित केले जात असल्याने संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला क्रिकेटप्रेमींच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशात आता संजूला दुसऱ्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून खेळण्याची ऑफर मिळाली असल्याचे समजत आहे.

भारताकडून केवळ २७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला संजू सॅमसन नेहमी एका संधीच्या प्रतिक्षेत असतो. अशातच इनसाईड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, आयर्लंड क्रिकेट बोर्डाने (Ireland Cricket Board) संजूला त्यांच्या देशाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. आयर्लंड बोर्डाने त्याला आश्वासन दिले आहे की, जर त्याला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत पुढे जायचे असेल, तर तो आयर्लंडला येऊ शकतो. तिथे त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व सामने खेळण्याची संधी मिळेल.

संजू सॅमसनने काय दिले उत्तर?
मात्र आयर्लंड बोर्डाच्या या ऑफरला संजूने अस्विकार केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला वगळता इतर कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याचा विचार त्याने केलेला नाही, असे उत्तर संजूने आयर्लंड बोर्डाला दिले आहे.

संजू सॅमसनने ऑफर स्विकारली असती तर काय झाले असते?
आयरिश क्रिकेट बोर्ड अशा क्रिकेटपटूंच्या शोधात आहे, जे केवळ शानदार फलंदाजीच नव्हे सोबतच संघाचे नेतृत्त्वही करू शकतील. जर संजूने त्यांची ऑफर स्विकारली असती, तर त्याला भारतीय क्रिकेट आणि आयपीएलला अलविदा म्हणावा लागला असता. १९ वर्षांखालील भारतीय संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदनेही असाच मार्ग स्विकारला आहे. आता तो अमेरिका संघाकडून क्रिकेट खेळतो.