सात बालकांना पेप्सीतून विषबाधा; पुरवठादाराची माहिती दिली न दिल्याने किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल

वाशिम  : कारंजा येथे सात बालकांना पेप्सीतून विषबाधा झाल्याअन्न व औषध प्रशासनाने वाशीममध्ये  मोठी कारवाई केली आहे.  अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी निलेश ताथोड यांनी कारंजा येथे सात बालकांना पेप्सीतून विषबाधा झाल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे.

1 मार्च रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्र. नि. काळे यांचेसमवेत कारंजा येथे जाऊन सर्व प्रथम राम मंदिर परिसरात जाऊन तपास चौकशी करुन बालकांनी सांगितल्यानुसार मे. कल्याणी किराणा, राम मंदिराजवळ, कारंजा लाड येथील हजर व्यक्तीची चौकशी केली असता त्याने त्याचे नांव राजेंद्र रामराव माहुलकर, वय 61 वर्षे व ते दुकानाचे मालक असल्याचे सांगितले.

सदर दुकानाची तपासणी केली असता तेथे पेप्सीचा कोणताही साठा आढळून आला नाही व तसेच सदर कथित विषबाधेस कारणीभूत पेप्सी हा अन्न पदार्थ कोणाकडून आणला व कोणत्या ब्रॅण्डचा होता याबाबत माहिती दुकान मालकाने दिली नाही. त्यामुळे या प्रकरणी दुकान मालकाने पुरवठादार तसेच उत्पादकाची माहिती न दिल्यामुळे तपासात बाधा येत असल्यामुळे संबंधिताविरुध्द कलम 179 नुसार फिर्याद देण्यात आली. जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी यांना पेप्सी व आईसकॅन्डी या अन्न पदार्थांचे नमुने घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी परवाना/नोंदणीधारक दुकानामधूनच अन्न पदार्थ खरेदी करावेत. सर्व दुकानदारांनी परवाना/नोंदणीधारक घाऊक व्यापारी/उत्पादक यांच्याकडून मालाची खरेदी करावी.त्याबाबत बिले/इनवॉईस जतन करुन ठेवावेत.असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी केले आहे.