प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएम- किसान योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे प्रतिवर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सध्या सुरू आहे. हा लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्यांना ई-केवायसी (E-KYC) करणे आणि लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. या बाबी पूर्ण झाल्या तरच योजनेचे पुढील हप्ते लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होतील.

ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांस स्वतः पीएम किसान पोर्टलवरील ‘फार्मर कॉर्नर’मधून (Farmer’s Corner) किंवा सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. लाभार्थ्यांने ‘फार्मर कॉर्नर’ मधून स्वत: ई-केवायसी करुन घेतल्यास त्यास कोणतेही शुल्क राहणार नाही. सामाईक सुविधा केंद्रातून ई-केवायसी करण्यासाठी प्रती लाभार्थी १५ रुपये शुल्क आकारणी करण्यात येईल.

लाभार्थींनी या योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड, बैंक पासबुक, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे बँकेत जाऊन आपले बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून डीबीटी सुविधा प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे उपआयुक्त (कृषि गणना) तथा पी. एम. किसान पथक प्रमुख गणेश घोरपडे यांनी केले आहे.