शक्ती कायदा विधेयक त्वरीत मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्याची गरज : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : महाराष्ट्र व देशात महिलांना समाजात कुप्रवृत्तीपासून संरक्षण मिळावे या हेतूने ‘शक्ती’ कायदा अस्तित्वात येण्यासाठी म्हणून राज्य सरकारने एक विशेष विधेयक मंजूर केले आहे. सदर विधेयक राज्यपाल महोदयांकडे पुढील कार्यवाहीसाठी प्रस्तावित आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी त्वरेने राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठविण्याची आवश्यकता आहे. या विधेयकास अंतिम मंजुरी मिळाल्यास अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या विकृत मानसिकतेवर प्रतिबंध होऊ शकेल. यासाठी आवश्यक ती प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केले.

सिल्व्हर रॉकस या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी आयोजित वार्तालापात त्या बोलत होत्या. पुणे जिल्ह्यात तळेगाव दाभाडे या ठिकाणी एका तरुण मुलीवर एकतर्फी प्रेमातून डोक्यावर हातोड्याने मारहाण करून जखमी करण्याचा निंदनीय प्रकार नुकताच घडला आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत ही घटना घडलेली असून या घटनेतील आरोपीला या पूर्वी पोलिसांनी ताकीद दिलेली होती. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्याच्याकडून लेखी जबाबही घेण्यात आलेला होता. त्याच्याकडून कोणतेही विघातक कृत्य घडू नये म्हणून समुपदेशन करून त्याला समजही देण्यात आलेली होती. असे असतानाही त्या तरुणाने असे गंभीर कृत्य केले आहे, या पार्श्वभूमीवर त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आल्या आहेत. या तरुणीच्या कुटुंबियांशीदेखील डॉ. गोऱ्हे यांचा संपर्क झाला असून त्यांना यावेळी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी याबाबत त्यांनी चर्चा करून याबाबत अधिक वेगाने तपास करून आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. भविष्यात या परिसरातील असे प्रकार टाळण्यासाठी तरुण मुले आणि त्यांचे पालकांसोबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पोलीस प्रशासनाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्याबाबत सूचित केले आहे. सदर मुलगी उपचार घेतलेल्या रुग्णालयाच्या प्रशासनालाही तिला प्रभावी उपचार देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. या मुलीला आवश्यकता भासल्यास आणखी काही काळ संरक्षण देण्याबाबत पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे. या प्रकरणी आरोपींना कोणत्याही परिस्थिती मध्ये जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते निर्देश डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेले आहेत.

महाराष्ट्रात नुकताच शक्ती कायदा व्हावा म्हणून विधेयक पास करण्यात आले आहे आणि ते राज्यपाल महोदयांकडे प्रस्तावित आहे. हे विधेयक कायद्यात रुपांतर करण्यासाठी त्वरेने राष्ट्रपती महोदयांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात यावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.