सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी आणखी वाढणार?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीबाबत गौप्यस्फोट केला. त्यानंतर या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनाही आपल्या पदावरुन पायउतार व्हाव लागलं. त्याच दरम्यान आता राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी दिलेल्या माहितीमुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडी (ED) समोर मोठा गौप्यस्फोट केल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत यादी पाठवल्याची माहिती सीताराम कुंटे यांनी ईडीला दिली असल्याचं सुत्रांकडून समोर आलं आहे. कुंटे यांची सहा तास ईडी चौकशी करण्यात आली. अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी सीताराम कुंटेंना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. या चौकशीत सीताराम कुंटे यांनी ईडीकडे अनेक गौप्यस्फोट केल्याची सुत्रांची माहिती आहे.

सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी कबुली ‘ईडी’समोर दिली आहे. यामध्ये संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कुठल्या जागी आणि कोणत्या पदावर बदली करायची, हे नमूद केलेले असायचे. अनिल देशमुख यांचा स्वीय सहायक संजीव पालांडे यांच्यामार्फत या अनधिकृत याद्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात असत. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने संबंधित याद्या स्वीकारण्यास नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे पोलीसांच्या बदल्या करताना या नावांचा समावेश केला जायचा, असे सीताराम कुंटे यांनी ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान सांगितल्याचे समजते.