मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदचं नाव घ्यायचं, आणि अडकवायचं असले प्रकार सुरु आहेत – शरद पवार

मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते. पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. त्यानंतर नवाब मलिक स्वतः ईडीच्या कार्यालयात गेले आहेत.

मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

नवाब मलिक यांच्या घरी पहाटे जाऊन ईडीनं जी कारवाई केली, त्यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणी कोणतंही आश्चर्य वाटलं नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलं असता, आता काय बोलयाचं यावर.. यात काही नवीव नाही, असं शरद पवार म्हणालेत. कुठलं तरी प्रकरण काढून मलिकांना अडकवलं जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, की आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होतीत., त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही, असं शरद पवार म्हणालेत. कशाची केस काढली त्यांनी..? एक साधी गोष्ट आहे, मुस्लिम कार्यकर्ता असला, की दाऊदचं नाव घ्यायचं, आणि अडकवायचं, असले प्रकार सुरु आहेत. ‘तुम्हाला माहीत असेल..कदाचित तुम्ही लहान त्या काळात.. माझ्यावरही असाच आरोप झाला होता.. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो.. याला आता 25-एक वर्ष झाली.. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं… जे लोकं भूमिका केंद्राच्या विरोधात स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रसा देण्याचा प्रयत्न आहे…’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी केलाय. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.