वाचाळवीर चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; बाष्कळ बडबड भोवली

Chandrakant Khaire News : शिवसेने चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या विरोधात वक्तव्य करणं भोवलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र हिम्मतराव जंजाळ यांनी खैरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ते म्हणाले आहेत की, ”एका वृत्त वाहिनीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री यांना उद्देशून लटकवुन मारले असते, तसेच अनेकदा बोके, चोर, रीक्षावाला असे शब्द वापरुन अपमानित केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे चारित्र्यहनन व प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला आहे.”

आपल्या तक्रारीत ते पुढे म्हणाले आहेत की, ”खैरे विविध माध्यमावर असंवैधानिक भाषेचा वापर करतात. तसेच दंगल घडविण्याच्या दृष्टीने दोन गटात भांडणे लावतात. दंगल घडविण्याचे उद्देशाने नेहमी वक्तव्य करणे व त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करणे, असे अनेक बेकायदेशीर वर्तन ते करत असतात. यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडू शकते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विधानामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.”