शरद पवार यांचं बोम्मई यांना 24 तासांचं अल्टीमेटम, हल्ले थांबले नाहीत तर …

Mumbai – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे. अशातच आता कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केलाय. पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या 24 तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवाळावी, यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. पुढील २४ तासात परिस्थिती निवळली पाहिजे. अन्यथा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. उद्यापासून संसदीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्यातील खासदारांना सांगणार आहे, की संसदेत भूमिका मांडा. कोणी कायदा हातात घेतला, तर त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारला घ्यावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.