भुजबळांना ब्राह्मण समाजाची माफी मागावीच लागणार अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ – देशपांडे

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी 26 तारखेला केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आता माघार घेतली आहे. आज देवी सरस्वतीची आरती करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे परंतु 3% चा उल्लेख करून ब्राह्मण समाजाची जी निंदानालस्ती केली होती त्याचे काय ? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते बोलाल आणि नंतर एकतर्फी वाद मिटला असे जाहीर कराल तर असे होणार नाही असे प्रतिपादन परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केले.

परशुराम सेवा संघाने या प्रकरणी छगन भुजबळ यांना कालच कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली होती. या नोटीसित आठ दिवसात माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी कायदेशीर कारवाईला घाबरून सरस्वती मातेची आरती केली आहे. तरी जोपर्यंत छगन भुजबळ ब्राह्मण समाजाची व हिंदू समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत आमच्या बाजूने हा वाद मिटणार नाही असे विश्वजीत देशपांडे यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.