जे ठाकरेंना जमले नाही ते शिंदेंनी करून दाखवलं; राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किमती करण्याचे जे काम ठाकरे सरकारला जमले नाही ते नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने करून दाखवले आहे. यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील (Petrol-Diesel)कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते. मात्र आता शिंदे सरकारने हा निर्णय घेत सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

नवीन सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोल 5 रुपये तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला आणि मालवाहतूकदारांनाही दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.